डॉ.चिंतामणराव देशमुख नाट्यगृह तरुण पिढीला प्रेरणादायी

           --उपमुख्यमंत्री अजित पवार

रायगड : प्रतिनिधी :- ऐतिहासिक रोहा शहरात नव्याने उभारण्यात आलेले डॉ.चिंतामणराव देशमुख नाट्यगृह तरुण पिढीला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. रोहा येथील डॉ.चिंतामणराव देशमुख नाट्यगृहाचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

 यावेळी खासदार सुनील तटकरे, महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, मुख्याधिकारी अजयकुमार येडके, सिने अभिनेता सयाजी शिंदे, भरत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

  यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, करोना काळात या नाट्यगृहाचे भूमिपूजन माझ्या हस्ते संपन्न झाले होते. त्याच नाट्यगृहाचे उद्घाटनही माझ्या हस्ते होत आहे याचा मला आनंद आहे. आपल्या वाडवडिलांनी जपलेल्या वास्तूंचे जतन झाले पाहिजे. डॉ.चिंतामणराव देशमुख यांची प्रशासकीय कारकीर्द खूप महत्वाची होती.  त्यांनी देशात चांगले काम केले आहे.  ते परदेशात असताना त्यांनी आपल्या बंगल्याला रोहा हे नाव दिले होते.        

    डॉ.चिंतामणराव देशमुख यांनी देशाच्याच नाही तर जगाच्या पटलावरही आपले नाव कोरले आहे. कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा क्षेत्रात कलेला खूप महत्व आहे. अष्टविनायक मंदिरापैकी रायगड जिल्ह्यात असलेल्या मंदिराचा विकास करावयाचा असून याकरिता आवश्यक असलेले प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कामामध्ये पारदर्शकता ठेवली पाहिजे, काम दर्जेदार झाले पाहिजे आणि झालेल्या कामांचे लोकांना समाधान वाटले पाहिजे.  या भव्यदिव्य वास्तूमध्ये लोकोपयोगी कार्यक्रम साजरे झाले पाहिजेत. 

 अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेले हे नाट्यगृह आरामदायी आसन व्यवस्था, उत्कृष्ट ध्वनी व प्रकाशयोजना, प्रशस्त आणि वातानुकूलित सभागृह, पार्किंग, कँटीन, प्रतिक्षालय यांसह सर्व आवश्यक सुविधा संपन्न आहे. रोहासह परिसरातील कलारसिक व कलाकारांसाठी हे एक हक्काचं व्यासपीठ ठरणार असून, राज्यभरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी हे नाट्यगृह महत्त्वाची भूमिका पार पाडेल, याबाबत शंका नाही.



Comments

Popular posts from this blog