दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर

रायगड : प्रतिनिधी :- ग्रामीण रोजगार व कौशल्य विकासास चालना देण्यासाठी भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचे (DDU-GKY) सुधारित रूप डीडीयू-जीकेवाय 2.0 सुरू केले आहे. या योजनेच्या अंमल बजावणीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहॆ. 

ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने नुकताच या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी श्री. अबू ओ. सैफी यांनी महाराष्ट्र राज्याचा तीन दिवसांचा दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यात राज्यातील विविध प्रशिक्षण केंद्रांना भेटी देऊन, योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी मार्गदर्शन केले. 

श्री. सैफी यांनी पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील RUDSET प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. प्रशिक्षणार्थी आणि प्रकल्प अंमलबजावणी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांनी योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची माहिती घेतली. प्रशिक्षण केंद्राच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांनी ग्रामीण युवकांसाठी शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे महत्व अधोरेखित केले. तथापि, एका केंद्रावर SOPs च्या पालनात त्रुटी आढळून आल्याने श्री. सैफी यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

नवी मुंबईतील राज्य व्यवस्थापन कक्ष-खारघर येथे मुख्य परिचालन अधिकारी श तुषार माळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत सध्याच्या योजनांची प्रगती, अडचणी आणि सुधारित योजनेच्या अंमलबजावणीच्या दिशानिर्देशांवर चर्चा झाली. श्री. सैफी यांनी महाराष्ट्रातील तयारीबाबत समाधान व्यक्त करत राज्याला डीडीयू-जीकेवाय 2.0 च्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र आघाडीचे राज्य असल्याचे सांगितले.  डीडीयू-जीकेवाय 2.0 अंतर्गत उद्योग क्षेत्राशी अधिक सखोल जोडणी, डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली आणि परिणामकेंद्रित अंमलबजावणी यावर भर दिला जाणार आहे. ही योजना ग्रामीण युवकांना कौशल्याधारित रोजगाराच्या संधी देत, देशाच्या ग्रामीण कार्यबलाला गतिशील रोजगार बाजाराशी संलग्न करण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे.

"ही भेट केवळ आढावा नसून, संस्थात्मक यंत्रणा बळकट करण्याचा आणि मॉनिटरींग प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा एक ठोस प्रयत्न आहे," असे श्री. सैफी यांनी नमूद केले.

ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्राला मिळणाऱ्या पाठिंब्याची खात्री देत, श्री. सैफी यांनी शाश्वत आणि समावेशक विकासाच्या उद्दिष्टांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र टीम सक्षम आहे असे विश्वासपूर्वक सांगितले.

Comments

Popular posts from this blog