जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडून जिल्हा परिषद शाळांची तपासणी; मूलभूत सुविधा व सुरक्षा उपायांची पाहणी

गडचिरोली : प्रतिनिधी :- जिल्हास्तरीय शाळा सुरक्षा समितीच्या तपासणी अंतर्गत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज जिल्हा परिषद शाळांना आकस्मिक भेटी देत शाळांमधील मूलभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी शौचालयांची उपलब्धता, जेवणासाठी उभारण्यात आलेल्या शेड्सची स्थिती आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुविधांचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळा काटली,  नगरी व वसाचक आदी शाळांना भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्याकडून शाळेतील सुविधा व अडचणी जाणून घेतल्या. या दौऱ्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक. एम. रमेश, शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, बाबासाहेब पवार प्रामुख्याने उपस्थित होते.

मूलभूत सुविधा व दुरुस्तीबाबत निर्देश

जिल्हाधिकारी पंडा यांनी सर्व शाळांमध्ये जेवणासाठी आवश्यक शेड्स पुढील एक वर्षात उभारण्यासाठी तातडीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या. यासोबतच स्वयंपाकाचे शेड अद्यावत करणे, शाळांच्या इमारतींमधील गळती थांबविण्यासाठी आणि स्वच्छता गृहांची दुरुस्ती तात्काळ करणे, जुन्या आणि निकामी झालेल्या साहित्याचे निर्लेखन करण्याची कार्यवाही त्वरीत पूर्ण करण्याचेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत का याचीही चौकशी करण्यात आली. तसेच, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालयांची सोय आहे का, याची तपासणी करत कमतरता आढळल्यास तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले.

या दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विपिन साळुंके, उपअभियंता श्री. भांडारकर, मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर समग्र शिक्षा अभियानाचे श्री. लांजेवार, श्रीमती हेमलता परसा, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र साहाळा, श्री. मुलकलवार यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog