कर्जत प्रशासन भवनात अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प नाही;
नागरिकांमध्ये तीव्र संताप,
पुरवठा व पेन्शन विभाग तळमजल्यावर हलवा, माऊली फाऊंडेशन ची आग्रही मागणी
पत्रकार : पंकेश जाधव :- कर्जत : कर्जत येथील प्रशासन भवनात अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी चालण्यास सोयीस्कर रॅम्पची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रशासन भवनात येणाऱ्या वयोवृद्ध, दिव्यांग व्यक्तींना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, तसेच पुरवठा व पेन्शनसंबंधी कामांसाठी भवनात येणाऱ्या नागरिकांना जिना चढणे-उतरणे मोठ्या त्रासाचे ठरत आहे.
शासकीय कार्यालये ही सर्वसामान्य नागरिकांसाठी सहज पोहोचण्याजोगी असावी, अशी सामान्य अपेक्षा असते. मात्र प्रशासन भवनात रॅम्प नसल्याने अपंग व ज्येष्ठ नागरिकांना शासकीय सेवा मिळविणेच अवघड झाले आहे. काही नागरिकांना तर दुसऱ्याच्या मदतीशिवाय वर जाणे शक्यच राहत नाही. त्यामुळे त्यांना अपमानास्पद व त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे.
या समस्येकडे प्रशासनाने वारंवार लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परिणामी, नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. विशेषतः, रोजंदारीवर काम करणाऱ्या वृद्ध व्यक्ती, शेतकरी, दिव्यांग व्यक्ती यांना पुरवठा कार्यालयात किंवा पेन्शनसाठी अधिकाऱ्यांची भेट घेणे गरजेचे असते. मात्र, ही कामे करताना शारीरिक त्रास सहन करावा लागतो, जी अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की, पुरवठा विभाग व पेन्शन विभाग ही कार्यालये तळमजल्यावर हलवावीत, जेणेकरून वृद्ध आणि अपंग नागरिकांना सहज प्रवेश मिळेल. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना सुलभ सेवा मिळण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
जर लवकरात लवकर याबाबत ठोस निर्णय घेतला नाही, तर नागरिकांकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काही माऊली फाऊंडेशन कडून दिला आहे. तसेच, प्रशासन भवनात अपंग व वृद्ध व्यक्तींच्या सोयीसाठी रॅम्प बांधणे ही कायदेशीर व सामाजिक बांधिलकी आहे, याची जाणीव प्रशासनाने ठेवावी, अशी भावना देखील व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment