जिल्ह्यातील मनरेगाची कामे प्राधान्याने पूर्ण करा
मनरेगा आयुक्त डॉ.भरत बास्टेवाड
रायगड : प्रतिनिधी :- जिल्ह्यातील मनरेगाच्या कामांकरिता केंद्र व राज्य शासनाकडून निधीची उपलब्धतता करुन दिली जाते. त्यामुळे जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत सुरु असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश मनरेगा आयुक्त डॉ.भरत बास्टेवाड यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित मनरेगाच्या कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.पं.राजेंद्र भालेराव, उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांसह जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मनरेगा आयुक्त डॉ.भरत बास्टेवाड म्हणाले की, मनरेगा अंतर्गत मागील वर्षातील काही कामे प्रलंबित असतील तर ती तातडीने पूर्ण करावीत जेणेकरुन पुढील नवीन कामांकरिता निधीची मागणी करण्याकरिता अडचण भासणार नाही. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आधारसिडींगची कामे शंभर टक्के पूर्ण करावीत. मनरेगा अंतर्गत कामांची तसेच अन्य कामांची पूर्ण माहिती मिळावी, याकरिता नवीन सॉप्टवेअर तयार करण्याचे काम सुरु असून ते सॉप्टवेअर आपणास देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जीओ टॅगिंगची कामेही प्राधान्याने करावीत. जिल्ह्यात बांबू लागवडीचे क्षेत्र तसेच फळबाग लागवड वाढविण्याकरिता प्रयत्नशील राहावे. जिल्ह्यातील जलजीवन, खारभूमी बंधारे, घरकुल बांधणे तसेच अन्य काही कामे प्रलंबित असतील तर ती पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. मागेल त्या प्रत्येकाला काम देण्यास आम्ही तत्पर असल्याचे डॉ.बास्टेवाड यांनी सांगितले.
Comments
Post a Comment