वृक्षरोपण आणि जलपुनर्भरणाद्वारे देता येईल
उष्णतेशी लढा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी :- उष्णतामान वाढ ही नैसर्गिक कमी व मानवनिर्मित समस्या आहे. त्याचा उपाय आपल्या सर्वांना एकत्र येऊन करावा लागेल. वृक्षरोपण आणि जलपुनर्भरण हे उष्णतामान वाढीवरील सर्वात प्रभावी उपाय आहे. त्याद्वारेच आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी जगणे सुकर करणारे पर्यावरण देऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
‘उष्णतेशी लढा’ या कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. या कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधी शास्त्र विभाग प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, ज्येष्ठ वास्तुविशारद अविनाश हवळ, डॉ. अविनाश गरुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के तसेच शाश्वत अधिवास विभाग सेंटर फॉर सायन्स ॲंण्ड डेव्हलपमेंटच्या कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती मिनाक्षी सिंह, सार्वजनिक आरोग्य चळवळ तज्ज्ञ डॉ. अनंत फडके, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुकास्तरीय अधिकारी आदी दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
वीज पुरवठ्यासाठी शासकीय कार्यालयांना सौरऊर्जेची जोड
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, मानवाच्या विविध पर्यावरण ऱ्हास करणाऱ्या जीवन शैली व हस्तक्षेपामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहे. वस्तूतः निसर्गाने दिलेले पर्यावरण आपण जतन व संर्वधन केले पाहिजे. आणि हे एकट्या दुकट्याचे काम नाही. किंवा कोण्या एका संस्थेचेही काम नाही. ते प्रत्येकाचे काम आहे. प्रत्येकाने त्यात आपले योगदान देणे आवश्यक आहे. त्यासाठी जलपुनर्भरण व वृक्षरोपण सारखे पर्याय प्रत्येकाने अंमलात आणणे आवश्यक आहे. तरच आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी जगण्यास पूरक पर्यावरण वारशात ठेऊ शकतो. पुढच्या पिढीला शुद्ध हवा, पाणी मिळावे यासाठी प्रत्येकाने किमान १० झाडे लावण्याचा व जगविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सौर उर्जेचा पर्याय निवडावा. जिल्हा प्रशासनानेही सर्व शासकीय कार्यालयांना सौर उर्जेवर वीज पुरवठा करण्यासाठी ४२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे, अशी माहितीही यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिली. उष्णतेशी आजच लढा देऊन भागणार नाही त्यासाठी कायम लढा द्यावा लागेल. ही एक चळवळ व्हावी असे आवाहनही त्यांनी केले.
उष्णतेविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे- देऊळगावकर
अतुल देऊळगावकर म्हणाले की, हवामान बदल ही संकल्पना १९८८ पासून प्रचलित झाली.पृथ्वीचे एकूणच तापमान १.५७ अंश सेल्सियसने वाढले आहे. उष्णतामान वाढण्यामुळे आरोग्य समस्याही निर्माण होऊ लागल्या आहेत. देशात २८१ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. त्यात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचाही समावेश आहे. पूर्वी रात्रीच्या वेळेस निर्माण होणारा गारवा आताशा कमीझाला आहे. एकूण भूभागाच्या ७५ टक्के भाग हा उष्णतेचा ताण वाढू लागला आहे. अशा या उष्णतेच्या समस्ये विरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे असे प्रतिपादन देऊळगावकर यांनी केले.
डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य यांनी उष्माघात आणि त्यामुळे मानवी शरिरावर होणारे परिणाम, त्यावरील उपचार या विषयी शास्त्रीय माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी वाढत्या तापमान समस्येचा मुकाबला करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधुन काम करावे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा. या कार्यशाळेत प्राप्त माहिती ही तळागाळापर्यंत पोहोचवावी. सर्व गर्दीच्या ठिकाणी सावलीसाठी उपाययोजना कराव्या,असे आवाहनही त्यांनी केले. अविनाश हवळ यांनी उष्णतामानाला पुरक वास्तू रचना व त्यासाठी करावयाच्या उपाययोजना यांची माहिती दिली.
प्रास्ताविक मारुती म्हस्के यांनी केले तर प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले.
Comments
Post a Comment