सिर्फ दिल, बिना बिल
डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा नवी मुंबईतील रुग्णालयांची केली पाहणी
मोफत आरोग्यसेवेचं केले प्रत्यक्ष निरीक्षण
रायगड : प्रतिनिधी : - आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याचा प्रारंभ गडचिरोलीपासून करत नवी मुंबईतील विविध महत्त्वाच्या रुग्णालयांना (दि.२३एप्रिल) भेटी दिल्या.
एमजीएम हॉस्पिटल (कामोठे), क्रिटी केअर (कामोठे), आशा हॉस्पिटल (कळंबोली), मिलेनियम हॉस्पिटल (उलवे) आणि सत्य साई संजीवनी बाल रुग्णालय (खारघर) या ठिकाणी त्यांनी आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांना मिळणाऱ्या मोफत सेवा प्रत्यक्ष पाहिल्या.
डॉ. शेटे यांनी उत्कृष्ट सेवा देणाऱ्या रुग्णालयांचे कौतुक करत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे विशेष अभिनंदन केले. त्याच वेळी, सेवा गुणवत्तेत त्रुटी आढळलेल्या संस्थांवर तात्काळ कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले.
खारघरमधील सत्य साई संजीवनी बाल रुग्णालयातील सेवाभावाने डॉ. शेटे भारावून गेले. हे महाराष्ट्रातील एकमेव बाल रुग्णालय आहे जेथे हृदयविकारग्रस्त बालकांसाठी "नो बिल काउंटर"च्या माध्यमातून संपूर्णपणे मोफत सेवा दिल्या जातात. देशभरातील गरजू बालकांसाठी येथे राहण्यापासून ते उपचारांपर्यंत सर्व सेवा निशुल्क आहेत.
या दौऱ्यादरम्यान त्यांनी नर्सिंग क्षेत्रात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींशीही संवाद साधला.
“सिर्फ दिल, बिना बिल” हे रुग्णालयाचं ब्रीदवाक्य केवळ शब्द नाही, तर मानवतेचा सर्वोच्च आदर्श आहे, असं सांगत त्यांनी महाराष्ट्रातील आरोग्यसेवेत अशा संस्थांचं योगदान अभिमानाने अधोरेखित केलं.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. अपर्णा पवार, पनवेल महानगरपालिका आरोग्य अधिकारी, डॉ. मनीषा चांडक, जिल्हा समन्वयक डॉ. क्षमा पलपटकर
व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment