सेवा हक्क कायद्याची दशकपूर्ती आणि पहिला ‘सेवा हक्क दिन’ साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

गडचिरोली : प्रतिनिधी : - नागरिकांना सुलभ आणि पारदर्शक सेवा देणाऱ्या लोकसेवा हक्क कायद्याची जागृती जिल्ह्यात वाढण्यासाठी येत्या 28 एप्रिल रोजी सेवा हक्क कायद्याची दशकपूर्ती आणि पहिला ‘सेवा हक्क दिन’ निमित्ताने विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या आहेत.

 राज्य शासनाने 28 एप्रिल 2015 पासून लागू केलेल्या लोकसेवा हक्क कायद्याचे उद्दिष्ट नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम आणि समयोचित सेवा प्रदान करणे आहे. हा कायदा शासकीय विभागांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. यंदा या कायद्याची दशकपूर्ती आणि पहिला सेवा हक्क दिन साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत आणि जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

ग्रामपंचायत स्तरावर उपक्रम: 

सेवा हक्क दिनानिमित्त ग्रामपंचायत स्तरावर आदर्श ‘आपले सरकार’ केंद्रांचे उद्घाटन होणार आहे. विशेष ग्रामसभांचे आयोजन करून लोकसेवा हक्क कायद्याच्या ठळक तरतुदींचे वाचन केले जाईल आणि ग्रामपंचायत सदस्यांना कायद्याच्या प्रती वितरित केल्या जातील. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कायद्याची माहिती देणारे सूचना फलक आणि अधिसूचित सेवा व शुल्काची माहिती देणारे क्यूआर कोड लावले जातील.

जिल्हास्तरीय उपक्रम: 

जिल्हास्तरावर विविध समारंभांचे आयोजन करून लोकसेवा हक्क कायद्याची वैशिष्ट्ये नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. विविध विभागांच्या सेवांचा आढावा घेऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जाईल. याशिवाय, ‘सेवा दूत’ योजना सुरू करणे, नागरिकांना एसएमएसद्वारे कायदा आणि ‘आपले सरकार’ पोर्टलची माहिती देणे, शाळा-महाविद्यालयांमध्ये जागृतीसाठी स्पर्धांचे आयोजन करणे आणि लोककलांचा वापर करून कायद्याचा प्रचार-प्रसार करणे यासारखे उपक्रम राबविले जाणार आहेत.

Comments

Popular posts from this blog