प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-सुरज पोर्टलचे लोकार्पण
जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सफाई कामगारांना पीपीई किटचे वाटप
रायगड : प्रतिनिधी :- देशातील वंचित व मागासवर्गातील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या पीएम-सुरज पोर्टलचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते नमस्ते योजनेंतर्गत सफाई कामगारांना पीपीई-किटचे तसेच वंचित घटकातील लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी जय मेहत्रे, सहायक आयुक्त समाज कल्याण सुनील जाधव, नगरपालिका प्रशासन अधिकारी श्याम पोशेट्टी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ (NBCFDC), राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (NSFDC) आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ (NSKFDC) या तीन राष्ट्रीय महामंडळामार्फत देशातील सर्व राज्यातील अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग व सफाई कर्मचारी यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सूरज पोर्टल सुरू करण्यात आले आहे. समाजातील सर्वात उपेक्षित घटकांचे उत्थान करणे हे या पोर्टलचे उद्दिष्ट आहे.
पीएम-सुरजच्या माध्यमातून वंचित आणि मागासवर्ग घटकांसाठी आर्थिक सहायता तसेच उद्योगांसाठीचे कर्ज सहज उपलब्ध होणार असल्याचे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, सरकारने 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. देशातील सफाई कामगारांच्या आरोग्यासाठीही केंद्र सरकार काम करत असून त्यांना आज पीपीई किट वाटप करण्यात येत आहेत. तसेच त्यांना आयुष्मान भारत (आभा) कार्ड देण्यात येत आहे. आभा कार्डच्या माध्यमातून त्यांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत.
Comments
Post a Comment